दीपक खिलारे
इंदापूर : शिवभक्त परिवार, इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे उद्घाटन आज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात झाले. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वीरपत्नी आणि वीरमाता यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करुन, अनोखे जिजाऊ पूजन केले.
या वेळी अमर शहीद जवान बाबूराव रामचंद्र साबळे (अंथुर्णे) यांच्या वीर पत्नी हेमलता बाबुराव साबळे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच वीर पत्नी प्रतिभा जैन यांना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयात शिक्षक नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे तेरावे वंशज सयाजी नामदेव गुजर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘राजमाता’ हे नाव उच्चारले की आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र दिसते ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे जगातील सर्वांत मोठे राजे छत्रपती शिवाजी महाराज… याचे जनक जर कोण असतील तर ते म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमातेचा विचार, त्यांची संकल्पना नव्या पिढीसमोर ठेवणे देणे ही काळाची गरज आहे. राजमाता जिजाऊंच्या जीवनात अनेक संकटे आली; मात्र, त्यांनी कधीही न डगमगता हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठीचा ध्येय संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. स्वामी विवेकानंदाच्या आत्मचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने आज सर्वोत्तम उपक्रम राबविला. आज एका वीर पत्नीला शिक्षक नियुक्तीपत्र देऊन त्यांना जिजाऊ जन्मोत्सवदिनी सन्मानित करता आले. विधवा स्त्रियांच्या स्त्री अलंकाराच्या संदर्भांत समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी जी सामाजिक चळवळ उभारली आहे, ती उल्लेखनीय आहे.
समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैभवशाली इतिहास, अनेक प्रसंग, शौर्य, पराक्रम विद्यार्थी व नागरिकांपुढे उभा करून मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रतापराव गुजर यांच्या कर्तृत्वातून आली आहे. जाती-धर्माच्या पुढे ती कर्तृत्ववान मावळ्यांच्या कार्याची ओळख आहे. युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आपण ‘अमर जवान’ म्हणतो, तसेच त्यांच्या वीर पत्नीला कायमस्वरूपी आपण सौभाग्यवतीचा सन्मान दिला पाहिजे.
या वेळी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे तेरावे वंशज सयाजी नामदेव गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख, निरा-भिमा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, ॲड. मनोहर चौधरी, ॲड. अशोक कोठारी, माजी नगरसेवक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापू जामदार, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे आणि शिवभक्त परिवाराचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले.