भिगवण : भादलवाडी तलाव हा खडकवासला कालव्यामधून आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून 100 क्षमतेने टक्के भरून घेण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये या तलावावरील शेतकरी, मच्छिमार यांच्यावर पाण्याअभावी अन्याय होत होता. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी दुष्काळामध्ये बांधलेला भादलवाडी तलाव हा शेतकरी, मच्छीमारांसाठी वरदान ठरला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलावाच्या पाण्याचे जलपूजन व मत्स्यबीज सोडण्याच्या कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याबद्दल आनंद व्यक्त केला व प्रत्येक वर्षी तलाव भरला जावा व परिसरातील शेतकरी, मच्छीमार भुई समाज आनंदी राहावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या तलावाचा डाळज, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी, तक्रारवाडी आदी परिसरातील शेतकरी व नागरिकांचा फायदा होत आहे. या तलावाच्या पाण्यावरती नळ पाणीपुरवठा योजनाही अवलंबून आहेत. आज तलावामध्ये मत्स्यबीज सोडण्यात आले असून, त्यामुळे मच्छीमार संस्थांना फायदा होणार आहे. त्यासाठी मच्छ विभागाचे सहकार्य लाभल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या जल पुजन व मत्स्यबीज सोडण्याच्या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.