Harshvardhan Patil News : भिगवण : सर्वसामान्य माणूस केंद्रभूत मानून समाजकारण व राजकारण करण्याचे धडे कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी दिले. मागील तीस वर्षांपासून कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या विचारांचा व विकासाचा वारसा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील समर्थपणे चालवित आहेत. हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकिर्द ही एका अर्थाने विकासाचे ध्यासपर्वच आहे, असे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. मनोहर चौधऱी यांनी सांगितले. येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ध्यासपर्व व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पराग जाधव होते. तर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रणजित भोंगळे, संपत बंडगर, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकिर्द ही एका अर्थाने विकासाचे ध्यासपर्वच…
ध्यासपर्व व्याख्यानमाला व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पहिले पुष्प ‘मानवी जीवनातील ऐतिहासिक क्रांतीचे महत्व’ या विषयावर बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. भुषण फडतरे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचे व विशेषतः पुणे जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्यापासून वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आदींनी स्वतःला स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये झोकुन दिले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इंदापूर व बारामती तालुक्यातील अनेकांनी १९४२ ‘चले जाव’ आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेत इंग्रजांना सळो की पळो करुन सोडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित राहिलेल्या व आपल्या आजूबाजूला असलेल्या या स्वातंत्र्यसेनानीच्या स्मृतीही आपण जागविल्या पाहिजे.
प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी ध्यासपर्व व्य़ाख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. प्रास्ताविक व प्रमुख मान्यवरांचा परिचय डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजाराम गावडे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रशांत चवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.