दीपक खिलारे
इंदापूर, (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उसाच्या एफआरपीमध्ये भरघोस वाढ करून, इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देणारे धोरण राबविले आहे. तसेच देशातील साखर उद्योग प्राप्तीकरातून कायमचा मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच आगामी काळातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी मोदी सरकारकडेच पुन्हा सत्ता द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शनिवारी (दि.4) पत्रकार परिषदेत केले.
ते पुढे म्हणाले, केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार अनेक वर्ष सत्तेत होते. मात्र, काँग्रेस सरकारने इथेनॉल संदर्भात शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका स्विकारली नाही. परंतु मोदी सरकारने इथेनॉलचे 5 वर्षाचे धोरण जाहीर केले. त्यामुळे सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 12 टक्क्यांपर्यंत गेले आहे. सन 2025 पर्यंत हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्री आमित शाह यांनी सन 1985 पासूनच्या प्राप्तिकराच्या नोटिसा मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय सन 2022 मध्ये घेतला. साखर कारखान्यांना सन 1985 पासून एम.एस.पी. किंवा एफ.आर.पी पेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला अधिकचा ऊस दर हा नफा समजून प्राप्तीकर भरण्याचे मोठे अर्थिक संकट उभे राहिले होते. या निर्णयामुळे साखर कारखानदारीसमोरील 8 हजार 400 कोटीच्या प्राप्तिकर वसुलीचे संकट कायमचे दूर झाले आहे.
केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतल्याने शेतकरी मोदी सरकारवर समाधानी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी हे मोदी सरकारला भरघोस मतदान करतील. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या बहुमताने निवडून येतील, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आगामी काळ भरभराटीचा : हर्षवर्धन पाटील
देशात 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि सुमारे 7 लाख साखर कर्मचारी आहेत. साखर उद्योग देशातील महत्त्वाचा उद्योग बनला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर साखर उद्योग व देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आगामी 10 वर्षांसाठी विकास आराखडा तयार केला जाईल. त्यामुळे आगामी काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरभराटीचा राहणार असल्याचा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.