दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘भाग्यश्री’ या निवासस्थानी दीपावली सणानिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमामध्ये दिवाळी फराळानिमित्त सर्वधर्मियांची मांदियाळी दिसून आली. रमजान ईद सणाला मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना शिरखुर्मा खाण्यासाठी बोलवतात, तसेच हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम समाजबांधवांना दिवाळी फराळासाठी निमंत्रित केले होते.
हर्षवर्धन पाटील यांनी सर्व जाती-धर्मातील बांधवांना दिवाळी फराळासाठी आपुलकीने भाग्यश्री बंगलो येथे बोलावले होते. आलेल्या सर्वांशी हर्षवर्धन पाटील यांनी आपुलकीने संवाद साधत विविध विषयांवर गप्पागोष्टी केल्या. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्यापासून गेली ७१ वर्षांमध्ये इंदापूर तालुक्याने सर्वधर्मसमभावाची परंपरा जोपासली आहे. हीच सर्वधर्मसमभावाची, बंधुत्वाची परंपरा आपणही पुढे चालू ठेवल्याचे या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रतिवर्षीप्रमाणे हर्षवर्धन पाटील व कुटुंबीयांकडून जनतेसाठी सोमवारी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने भाग्यश्री बंगलो व परिसर हा स्नेहमीलन कार्यक्रमनिमित्ताने राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, सर्वधर्मीय नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. या वेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, राजवर्धन पाटील यांनी जनतेच्या शुभेच्छा स्विकारल्या. दरम्यान, भाग्यश्री बंगलो येथे सोमवारी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी पहायला मिळाली.