इंदापूर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित आहेत. आज हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना हर्षवर्धव पाटील म्हणाले, ”मागील दोन महिन्यांपासून मी इंदापुरमध्ये फिरत आहे. अनेक लोकांशी बोलतोय. तुम्ही विधानसभा लढायला हवी, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांची भावना मी भाजपमधील नेत्यांपर्यंत पोहोचवली,’ असे म्हणत पाटील यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असल्यांचं त्यांनी सांगितलं आहे.
भाजपची साथ सोडण्यामागचं कारण काय?
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ का सोडली आणि ते शरद पवार गटामध्ये का प्रवेश करणार आहेत यामागचं कारण त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ‘मी आज प्रवेश करतोय. 10 वर्षे तालुक्याचा विकास का झाला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी देईल. प्रत्येकाला निवडणुकीत इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मोठी तयारी आमची झालेली आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतले आहे.’ तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत आजचा प्रवेश विधानसभा प्रचाराची सुरूवात आहे असं राजवर्धन पाटील यांनी सांगितले. इंदापूरमध्ये लोकं दहशतीखाली आहेत.