सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यात विधानसभेचे पडघम सद्या जोरात वाजू लागले असून तालुक्यात चर्चा रंगलीय ती फक्त हर्षवर्धन पाटील यांच्या आमदारकीच्या तिकीटाची… भाजपमधील जेष्ठ नेत्याच्या एका विधानामुळे बरेचसे चित्र स्पष्ट झाल्यामुळे नाराज झालेले हर्षवर्धन पाटील हे भाजपामधून फारकत घेऊन आपली अपक्ष आमदारकीची वेगळी चूल मांडणार का? असा प्रश्न समर्थकांसह संपूर्ण तालुक्याला पडला आहे.
परंतु मागील काही दिवसांपूर्वी माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुणे या ठिकाणी बंद दाराआड झालेल्या चर्चेने हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार अशी चर्चा तालुक्यासह महाराष्ट्रभर पसरली. त्यातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलेल्या प्रश्नामुळे हर्षवर्धन पाटील यांचा स्वाभिमान दुखावला गेल्याने जेष्ठ नेत्याला मिळालेल्या या वागणुकीमुळे ते आपला स्वाभिमान जपण्यासाठी आता भाजप पक्षाला लवकरच सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांचे विमान कोणत्या दिशेने उडणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे? याचं उत्तर मात्र येणारी वेळच सांगणार आहे.
अलिकडेच हर्षवर्धन पाटील यांनी समर्थकांचे मत जाणुन घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा आयोजित केला. या मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. महायुतीत अगोदरच ठरलेल्याप्रमाणे ज्याचा विद्यमान आमदार असेल तोच पक्ष ती जागा लढविणार असे ठरले आहे. त्यामुळे स्वाभाविकच इंदापूरची जागा अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणे यांना मिळणार असून तसे संकेतही अजित पवारांनी इंदापूर तालुक्यात जनसन्मान यात्रेच्या दौऱ्यादरम्यान दिले होते.
अजित पवारांच्या दाव्याने हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे वेगळी भूमिका घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही झालं तर इंदापुरची जागा ही महायुतीत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळणार आहे. त्यामुळे भरणेही आता जोमाने तयारीला लागले आहेत. महायुतीत लोकसभेच्या निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील चालतात पण विधानसभा आली का त्यांना जाणूनबुजून दाबून त्यांची गळजेपी करण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला असल्यामुळे आता मात्र हर्षवर्धन पाटील समर्थकांनीही ‛रामकृष्ण हरी वाजवा तुतारी’ असा नारा दिला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे येत्या चार ते पाच दिवसातच आपला निर्णय घेतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
निष्ठावंतांचं काय?
लोकसभेच्या निवडणुकी वेळेस अजित पवार गटाच्या बाजूने दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, प्रवीण भैय्या माने यांसारख्या अनेक दिग्गज नेते खासदार सुळे यांच्या विरोधात होते. पण या कठीण प्रसंगी देखील शरद पवार यांच्या वरती असणाऱ्या निष्ठे प्रती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व त्यांचे समर्थक हे मात्र ठामपणे सुप्रिया सुळे यांच्या मागे उभे राहिले.
इंदापूर तालुक्यातून जवळपास 25 हजार मतांची आघाडी देत यशस्वी झाल्यामुळे तालुक्यातून शरद पवार गटाकडून आमदारकीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु मध्यंतरीच लोकसभेच्या वेळी अजित पवार गटात असणारे प्रवीण माने हे दबाव तंत्राला न जुमानता पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये सामील झाल्याने एक युवा नेतृत्व म्हणून आमदारकीच्या रेसमध्ये त्यांचे नाव घेतले जात आहे.
तर हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपला सोडचिट्टी देऊन लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे का? हे येत्या चार-पाच दिवसांमध्येच स्पष्ट होणार असल्यामुळे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनाही आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यामुळे लोकसभेच्या वेळी निष्ठावंत म्हणून ज्यांनी काम केले ते आप्पासाहेब जगदाळे यांना आमदारकीचे तिकीट मिळणार का त्यांना डावलले जाणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.