दीपक खिलारे
इंदापूर : २२ जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आपण सर्वांनी प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापना दिनाचा उत्सव गावातील प्रत्येक मंदिरामध्ये, आपल्या घरामध्ये भक्तीभावाने व आनंदाने साजरा करावा, असे आवाहन माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (ता. २१) सहकाऱ्यांसमवेत इंदापूर येथील श्रीराम मंदिराची स्वच्छता केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मंदिर स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. अनेक भक्तगण याठिकाणी उत्साहाने सहभागी झाले. सर्व जाती-धर्माचे लोक याठिकाणी उपस्थित राहिले. उद्या प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना अयोध्या येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राम मंदिरामध्ये भजन-कीर्तन होणार आहे. तसेच प्रभू श्रीरामाची भक्तीभावाने पूजा-अर्चा केली जाणार आहे. अयोध्या येथील कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर दाखविण्याची सोय शहरातील राम मंदिरामध्ये केली आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे.
सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार असून, ही मिरवणूक इंदापूर नगरपालिकेपर्यंत असेल. या मिरवणुकीमध्ये सर्व रामभक्त आणि एक ते दीड हजार महिला उस्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. इंदापूर नगरपालिकेसमोर ७ वाजता सर्व महिला दीप उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. या वेळी आतषबाजी होणार आहे. त्यानंतर प्रत्येकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी मिळून हे नियोजन केले आहे. सर्वांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून, देवपूजा करून अत्यंत आनंदाने, भक्ती-भावाने हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागरिकांना केले.
नव्या पिढीमध्ये रामाचा विचार रुजवावा
जगाच्या नकाशात अयोध्या हे महत्त्वाचे शहर आहे. अयोध्या म्हटले की भारत, भारत म्हटले की अयोध्या ही वेगळी ओळख जगामध्ये आहे. प्रभू रामचंद्रांचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. ते संस्कार, ती नैतिकता, ते अधिष्ठान होय. हे सर्व नव्या पिढीसमोर सातत्याने रहावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.