पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभेच्या आधी अनेकजण शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेण्यास उत्सुक असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता आज पुण्यात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील वसंत दादा शुगर इन्स्टिट्युट येथील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपचे कमळ सोडन राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुले या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे. आजच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमकं काय बोलणं झाले हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुण्यामधील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आज पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माढ्याचे आमदार बबन शिंदे, राजेश टोपे, अहमदनगरचे विवेक कोल्हे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, इंदापूर विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला तिकीट मिळणार असल्याचे सुत्र महायुतीने ठरवले आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने ते अस्वस्थ दिसत आहेत.