इंदापूर: राज्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत अनेक हायहोल्टेज लढती होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येथे महायुतीचे दत्ता भरणे, महाविकास आघाडीचे हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने अशी तिरंगी लढत होणार आहे. सध्याच्या घडीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विरोधक एकवटल्याने आणि प्रवीण माने यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने पाटील हे अडचणीत सापडले आहेत. त्यातच त्यांच्या भावाने देखील साथ सोडली आहे.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच पक्षाकडून त्यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी देखील देण्यात आली. परंतु, हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिल्यानंतर शरद पवार यांच्या इंदापूर राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर अप्पासाहेब जगदाळे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
अशातच हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूर पाटील यांनी त्यांची साथ सोडत प्रवीण माने यांना पांंठिबा जाहीर केला आहे. हा हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीनंतर पाटील कुटुंबात मोठी फूट पडली आहे. मयूर पाटील यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती म्हणून काम केले असून त्यांचे तालुक्यात मोठे राजकीय वर्चस्व असल्याचे मानले जाते. मयूर पाटील यांच्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेंच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील राजकीय आणि कौटुंबिक अशी दुहेरी कोंडी झाली असल्याचे बोलले जात आहे.
तसेच जातीय ध्रुवीकरण देखील हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात जाताना पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्या पाठीमागे धनगर समाज एकजुटीने उभा राहणायची शक्यता आहे. तर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण पाटील हे दोघेही मराठा उमेदवार असल्याने मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होणार हे नक्की आहे. त्याचा सरळ फटका हा पाटील यांना बसणार आहे. त्यातच स्वकीयांसह सर्वच राजकीय पाटील यांच्या विरोधात एकवटल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची वाट बिकट असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. आता यामधून पाटील हे कसा मार्ग काढतात, हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.