भिगवण : उजनी धरणामध्ये पुणे व सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचे मत्स्यबीज सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पुणे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. याबाबत पाठविलेल्या पत्रानुसार उजनी धरण हे महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मासेमारीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कुटुंब उजनी धरणातील मासेमारीवर अवलंबून आहेत.
सध्या अनुकूल पर्जन्यमानामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. काही दिवसांत धरणातून नदीपात्रांमध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येईल. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचे तर सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचे मत्स्यबीज उजनी धरणामध्ये सोडण्यात यावे. दोन्ही जिल्हा परिषदांच्या नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी धरणामध्ये मत्स्यबीज सोडल्यास उजनी धरण परिसरातील मच्छीमारांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.