इंदापूर: “आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा विधानसभा २०२४”, अशा आशयाचे बॅनर इंदापुरात झळकत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलही इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे विधानसभेला इंदापूरची जागा महायुतीमध्ये कोणाला सुटणार? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता मिळत नाही. परंतु, महायुतीमध्ये असणारे सर्व वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
2019 मध्ये कोणाला किती मतं?
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार दत्तात्रय भरणे मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. आमदार दत्तात्रय भरणे यांना 114,960, तर हर्षवर्धन पाटलांना 111,850 मतं मिळाली होती. हर्षवर्धन पाटलांचा 3,110 एवढ्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील संघर्ष गेल्या पाच वर्षांत टोकाला गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे आहे.