लोणी काळभोर : प्रशासनाने सरपंचपद अपात्र ठरविल्यानंतर केवळ सरपंचपदाची निवडणूक लावण्याऐवजी उपसरपंचपदाची निवडणूक लावल्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर बहुचर्चित कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरेश शामराव गोठे हे बिनविरोध निवडून आले.
कुंजीरवाडीच्या तत्कालीन सरपंच अंजू गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाला निर्धारीत वेळेत सादर केला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तसेच पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे कुंजीरवाडीचे सरपंचपद रिक्त झाले होते. सरपंचपद रिक्त झाल्याने प्रशासनाने सरपंचपदाच्या निवडणुकीचे आदेश दिले होते. मात्र, थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याऐवजी उपसरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्ती करून सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.
दरम्यान, कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता. ८) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत हरेश गोठे यांचा एकमेव अर्ज आल्याने कवडे यांनी गोठे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या निवडणुकीत ग्राम विकास अधिकारी सविता भुजबळ यांनी शासकीय कामकाज पाहिले.
दरम्यान, हरेश गोठे यांची सरपंचपदी निवड होताच, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच हरेश गोठे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कार करून गावातून मिरवणूक काढण्यात आली.
कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, भाजपा हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष सुभाष कुंजीर, गोरख घुले आदेश जाधव, माजी उपसरपंच भरत निगडे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, सागर निगडे, बापूसाहेब घुले, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सचिन कुंजीर, गणेश कुंजीर, काळुराम कुंजीर, गजानन जगताप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत बोलताना नवनिर्वाचित सरपंच हरेश गोठे म्हणाले की, आगामी काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. गावातील गट-तट विसरून सर्व घटकांना भारतीय घटनेप्रमाणे समान न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.