पुणे : इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे गज कापून, काचा फोडून चोरटा आत शिरला. परंतु, पैसे न मिळाल्याने संतप्त झालेल्या चोरट्याने बँकेतील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून नुकसान केले. तसेच हार्ड डिक्स, स्वीच तसेच भिंतीवरील घड्याळ लंपास केले. एवढ्यावरच न थांबता चोरट्याने शेजारीला ग्रामपंचायत कार्यालय, पोस्ट ऑफिस कार्यालय देखील तोडून तेथील कागदपत्रे अस्ताव्यस्त पसरवून नुकसान केले. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.
याबाबत बँकेचे व्यवस्थापक दिलीप बलभीम गोसावी (वय ५३) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँक बंद असताना चोरट्याने इमारतीच्या पाठीमागील बाजूने खिडकीचे गज कापून काचा फोडून आत प्रवेश केला. बँकेचा पुढील बाजूचा दरवाजा उघडला. तसेच बँकेमधील तीन लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. त्यामधील कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकली.
चोरट्याने नेटवर्क रँकमधील नेटवर्क स्वीच, हार्डडिक्स, एन. व्ही. आर., पी. ओ. ई. स्विच तसेच भिंतीवरील घड्याळ असा ४५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला. त्यानंतर चोरट्याने शेजारील ग्रामपंचायतीचे कार्यालय तसेच पोस्ट ऑफिसमधील क्लार्क कार्यालयाचा दरवाजा तोडून नुकसान केले. आतील कागदपत्रे अस्ताव्यस्त पसरून टाकली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करीत आहेत.