पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात प्रसिद्ध असलेली पुण्याची ‘मस्तानी’ दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच, तिला सतत टोमणे मारत शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २०१४ पासून २०२३ या कालावधीत बाणेर-पाषाण लिंक रोडवरील शांती निकेतन सोसायटीमध्ये घडला. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून पती केदार किशोर भानू(वय ३८), सासू कविता किशोर भानू (दोघेही रा. शांती निकेतन, बाणेर-पाषाण लिंक रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती केदार यांचा विवाह २०१४ साली झाला होता. त्यावेळी पती आणि सासूने फिर्यादीला ‘तुझ्या आईवडीलांनी लग्नामध्ये ‘सुजाता मस्तानी’ दिली नाही. भेटवस्तु दिल्या नाहीत. असं म्हणत छळ सुरू केला. त्यानंतर, वारंवार सासूने मी सरकारी अधिकारी आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. तु अतिसामान्य घरामधली आहेस. तुझी लायकी नसताना तु माझ्या घरात आलीस. असे म्हणत टोमणे मारत.
दरम्यान, फिर्यादी गरोदर राहिल्या. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी फिर्यादीकडून घरकाम व्यवस्थित झाले नाही म्हणून प्लॅस्टिकच्या बॅटने मारहाण केली. तसेच, घरामधील महागड्या वस्तू घेण्याकरिता आईवडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला. आईवडिलांकडून पैसे आणले नाहीस तर इथे राहू देणार नाही असे तिला सांगितले. तसेच, पतीने अन्य मुलींशी संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपस पोलीस करत आहेत.