पुणे : लग्नात मर्सिडीज गाडी भेट दिली नाही म्हणून तसेच व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१५ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत लोणावळा आणि बाणेर या ठिकाणी घडला आहे.
याप्रकरणी पती योगेश नामदेव चव्हाण (वय-४०), सासू विमल नामदेव चव्हाण (वय-६५), सासरे नामदेव रामभाऊ चव्हाण (वय-७०), दीर उज्वल नामदेव चव्हाण (वय-४६), सुहास नामदेव चव्हाण (वय-४४, सर्व रा. श्रयसाफल्य, आदर्श कॉलनी, लोणावळा) यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विवाहित महिला ही औंध येथे राहण्यास आहे. त्यांना एक मुलगी आहे. फिर्यादी महिलेचे आणि योगेश यांचे २०१५ साली लग्न झाले होते. त्यांचे लग्न जमल्यानंतर लग्नात आईवडीलांकडून मर्सिडीज गाडी घेऊन येण्यासाठी योगेश दबाव टाकायचा. तसेच, लग्न मेरियट हॉटेलमध्ये लावून द्यावे, अन्यथा मी लग्नच करणार नाही अशी धमकी देत होता.
मात्र, लग्नात या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यावरून लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, फिर्यादीचे पती योगेश हे नोकरी करत होते. त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. पैसे आणले नाहीत तर येथे राहू नको अशी धमकी दिली.
याबाबत सासू, सासरे, तसेच दीर यांना विवाहीतीने सांगितले. त्यावेळी ‘जसे मुलगा म्हणेल तसे वागावे लागेल. नाहीतर निघून जा, अशी धमकी दिली. तसेच त्यांचा वारंवार शारिरीक मानसिक छळ करून भावाला फोनवरुन शिवीगाळ केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक निरीक्षक सुजाता शानमे करीत आहेत.