पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आपल्या पक्षाचा कोणत्याही कारणास्तव अपप्रचार होऊ नये, यासाठी सावधगिरी बाळगली जात आहे. असे असताना विरोधी पक्षांना पुण्यातील भाजपच्या नेत्यांनी आयते कोलीत हाती दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील नाटक तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रकरणात गोंधळ विरोधकांनी गोंधळ घातला. यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वीच अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने अवघे पुणे शहर भगवेमय झाले होते. या वातावरणाचा फायदा घेत लोकसभा निवडणुकीचा डंका पोहचविण्याची रणनीती भाजपने आखली होती. परंतु शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे वातावरण गढूळ झाले आहे. याचा फटका लोकसभेच्या निवडणूकीला बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेत्यांनी झापल्यामुळे आता पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर तोंड लपविण्याची वेळ आली आहे. भाजपचे कार्यकर्ते पुण्यामध्ये तेढ निर्माण करत असल्याचे यातून समोर आले आहे. याचे विपरित सामाजिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतात, हे लक्षात आणून देत केंद्रातील भाजप नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. तो प्रयोग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या युवकांनी बंद पाडला. त्यावरून संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात धुडघूस घालण्यात आला होता. त्यामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे सर्वच स्तरातून भाजपवर टीका करण्यात आली होती. याचे पडसाद थेट केंद्रामध्ये उमटले आहेत. हा प्रकार शांत होत नाही तोच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रकरणावरून पुण्यातील भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांची पुन्हा नाराजी ओढवून घेतली. वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका केल्यामुळे आम्ही निखिल वागळेंची सभा होऊ देणार नसल्याचे खुले आव्हान पुण्यातील भाजप नेत्यांनी दिले होते. त्यानंतर सभाच होणारच, असा निर्धार करत वागळे पुण्यात दाखल झाले. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली, शाईफेक केली, विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतरही वागळे यांची सभा यशस्वी झाली.
दरम्यान, एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला झाल्याने याची दखल देशभर घेण्यात आली. तसेच याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार का केले जात आहेत, याचा जाब भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना विचारत त्यांना झापल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापुढे अशा गोष्टी न करता लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करा, अन्यथा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात बोलले अथवा विरोध केला तरी ईडीची नोटीस येत आहे. असा अप्रत्यक्ष दम भाजप सरकार देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना देत आहे. यापैकी काहीच केले नाही तर थेट कारवाई केली जात असून त्रास दिला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने काही केले तरी आम्ही घाबरणार नाही. आमच्या हक्कांवर निर्बंध आणले तरी मागे हटणार नाही, असा निश्चयच आता भाजपविरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांनी आणि नेत्यांनी केला आहे. एकवेळी मरण पत्करु, पण शरण जाणार नाही, असा संदेश ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दिला. त्यानंतर निर्भय बनो ही सभा यशस्वी झाली. या यशस्वी सभेमुळे आता राज्यभरात या नावाने सभा होतील काय? हे लवकरच समोर येणार आहे.