पुणे : पुणे विभागातून दौंड-सोलापूर आणि पुणे-हरंगुळ, पुणे-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे स्टेशनवर वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना प्रवासासाठी अडचणी येऊ नये. तसेच गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच, या सर्व गाड्यांचे दिवस, वेळ, रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नाही. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे-हरंगुळ दरम्यान दैनंदिन धावणारी विशेष गाडी मंगळवारपर्यंत (दि.३१ डिसेंबर) अधिसूचित करण्यात आली होती. परंतु, वाढत्या प्रवासी संख्येमुळे आता ३१ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे. तर, हरंगुळ-पुणे दैनंदिन धावणारी विशेष गाडी (दि. ३१ डिसेंबर) पर्यंत चालविण्यात येणार होती. आता या गाडीची कालावधी देखील ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
पुणे-कोल्हापूर दरम्यान दैनंदिन धावणारी विशेष गाडी मंगळवारपर्यंत (दि. ३१ डिसेंबर) अधिसूचित करण्यात आली होती. आता ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे, तर कोल्हापूर-पुणे दरम्यान धावणारी विशेष गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे. त्यामुळे या भागात नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे. तर, सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी मंगळवारपर्यंत (दि. ३१ डिसेंबर) धावणार होती. मात्र, आता या गाडीला २५ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २६ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे. दौंड-सोलापूर-दौंड डेमू अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तर, सोलापूर-दौंड दैनंदिन डेमूचा कालावधी ही ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे.