केडगाव (पुणे) : केंद्र शासनाकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. 9 ऑगस्टपासून याचा प्रारंभ झाला असून, 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा हे अभियान राबवावे, असे आवाहन मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी केले आहे.
नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, हा याचा मूळ उद्देश आहे. गेल्या दोन वर्षांत हर घर तिरंगा मोहीम लोकचळवळ बनली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे.
या वर्षीसुद्धा ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुषंगाने 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हे अभियान राबवावे, नागरिकांनी कापडी राष्ट्रध्वज खरेदी करून मोहीम कालावधीत सन्मानाने आपल्या घरावरती, गच्चीमध्ये नियमानुसार राष्ट्रध्वज फडकवावा. तसेच दौंड नगरपरिषद तर्फे आयोजित घोषवाक्य स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, सायकल रॅली, रिक्षा रॅली, सेल्फी विथ तिरंगा, रांगोळी स्पर्धा, हर घर तिरंगा अभियानांतर्गत शपथ घेणे, हर घर तिरंगा अभियानाच्या वेबसाईटवर सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र तयार करणे अशी विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी केले आहे.