पुणे : आत्तापर्यंत आपण सर्वानीच गाडी, टीव्ही, फ्रिज, मोबाइल किंवा अजून काही वस्तू हप्त्यावर घेतल्याचे ऐकलं असेल आणि तुम्हीही घेतल्या असतील. पण आता चक्क आंबे हप्त्यांवर मिळत आहेत. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर परिसरातील एका व्यापाऱ्याने हा प्रयोग केला असून याला ग्राहकांची पसंती देखील मिळत आहे.
सध्या आंब्यांचा सीझन सुरु होत आहे. गुढीपाडवा झाला की अनेक लोक आंब्यांवर ताव मारतात. याच आंब्याची पेटी आता पुण्यात हप्त्यावर मिळणार आहे. सध्या EMI चं जग आहे. कोणतीही मोठी वस्तू विकत घ्यायची असल्यास आपण हप्त्यावर घेत असतो. मात्र आता थेट आंब्याची पेटी EMI ने मिळत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील गौरव सणस यांनी ही योजना राबविली आहे.
देवगड व रत्नागिरी हापूस या आंब्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे देश-विदेशातून मोठी मागणी आहे. मात्र, जास्त किंमत असल्यामुळे अनेकांना हे आंबे घेणे परवडत नाही. सर्वांना आंबे खरेदी करता यावेत, यासाठी गौरव यांनी ही अनोखी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या बारा वर्षांपासून गौरव सणस हे आंबे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर परिसरात त्यांचं दुकान आहे. या वर्षीपासून त्यांनी दुकानात ईएमआयवर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. हापूस आंबा ईएमआयवर खरेदी करायचा असेल तर तर बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड आवश्यक आहे. येथील दुकानामध्ये पीओएस मशीन ठेवले आहे. संबंधित बँकेकडूनच ग्राहकाला ३ ते १२ महिन्यांपर्यंत हप्ते जोडून दिले जात आहे. त्यांच्याकडून काही ग्राहकांनी आंबे देखील विकत घेतलेले आहेत. हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.