पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे भविष्यात शहरात पाणी टंचाईची शक्यता आहे. आता पुणेकरांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी “टाटा” कंपनीने मोलाची मदत केली आहे. टाटा कंपनीने पुणेकरांना मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे.
पुणे शहराला सध्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सध्याचे नियोजन पुणे शहरासाठी अपूर्ण पडत आहे. यासाठी टाटा कंपनीच्या मालकीचे असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. त्यांना टाटा कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पुणेकरांच्या पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मुळशी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे. यामुळे जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल, त्यातून पुणे शहराला पाणी देता येणार आहे. धरणाची उंची १ मीटरने वाढवल्यानंतर हे पाणी शहराला मिळणार आहे. या पाण्यामुळे परिसरातील जमीन ओलिताखाली येणार आहे. पाण्याखाली जाणारी ८० टक्के जमीन टाटा कंपनीच्या मालकीची आहे. परंतु २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन राज्य सरकारकडून संपादीत केली जाणार आहे. यामुळे हा विषय निकाली निघणार आहे.
याबाबत अजित पवार यांनी जलसंपदा विभागाची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले. मुळशी धरणाची उंची वाढल्यास पाण्याचा फुगवटा तयार होईल. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांनी कंपनीची भूमिका देखील समजून घेतली. तसेच कंपनीच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे सांगितले. त्यामुळेच टाटा कंपनीने ५० गावांना पाणी देण्याचा निर्णय मान्य केला आहे.