पुणे : पुण्यात टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्यांवर नागरिकांच्या लटुमारीच्या घटनां गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडताना दिसत आहेत. याप्रकरणी नागरिकांनी अनेकदा तक्रारी देखील केल्या होत्या. अखेर हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या युगुलांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून यापूर्वी घडलेले आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
स्वप्नील शिवाजी डोंबे (वय ३२, रा. जनता वसाहत), अनिकेत अनिल स्वामी (वय २५, मुळ रा. जनता वसाहत, सध्या रा. किरकटवाडी, सिंडगड रोड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गेले वर्षभर हनुमान टेकडी परिसरात फिरुन धारदार शस्त्राचा धाक दाखवून मुलामुलींच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान टेकडीवर गेलेल्या एका युगुलाला भर दुपारी शस्त्राचा धाक दाखवून तरुणीच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना डेक्कन पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण तसेच बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना एका गाडीचा नंबर मिळाला होता.
त्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. स्वप्नील डोंबे व अनिकेत स्वामी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर डेक्कन पोलीस ठाणे, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून ४ गुन्ह्यातील साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करीत असताना धारदार शस्त्र घेऊन फिरणारा मॉन्टी ऊर्फ तेजस खराडे (वय २३, रा. जनता वसाहत) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सिंहगड रोड, दत्तवाडी तसेच डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.