पुणे : पुणे विमानतळावर वाकड परिसरातील एका महिलेने धक्कादायक कृत्य केलं आहे. त्या महिलेने विमानामध्ये आसनावरुन दोघा प्रवाशांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. यानंतर मध्यस्थी करण्यास आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान महिलेला धक्काबुक्की करून हाताचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. प्रियंका रेड्डी असं चावा घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी वाकड येथील ४४ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीआयएसएफमधील जवान प्रियंका रेड्डी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दिल्ली विमानातून सदरील महिला शनिवारी सकाळी दिल्लीला जात होती. त्यावेळी विमानातील आसन क्रमांकावरन त्यांचा अवंतिका बोरसे, आदित्य बोरसे यांच्याशी वाद झाला. वादातून आरोपी महिलेने त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेची माहिती मिळताच प्रियंका रेड्डी आणि त्यांच्या सहकारी सोनिका पाल यांनी वादात मध्यस्थी केली. त्यानंतर महिलेने प्रियंका रेड्डी आणि पाल यांनाही शिवीगाळ करत धक्काबुकी केली. तसेच प्रियंका रेड्डी यांच्या हाताचा चावा घेतला.
दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५ (०५) अन्वये सदरील महिलेला नोटीस बजावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक होळकर तपास करत आहेत.