संदीप बोडके
हडपसर (पुणे): तलाठी कार्यालयातील विलंबाच्या कारभाराबाबत “पुणे प्राईम न्यूज”ने “हडपसर तलाठी कार्यालयाची पॉवर”, “प्रोटोकॉल केला, तरच काम अन्यथा आप लाईन पे बने रहे” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे हडपसरचे तलाठी स्वरुप पवार यांनी अखेर तब्बल 135 दिवसांच्या विलंबाने एका खरेदीखत दस्ताची नोंद शनिवारी २१ सप्टेंबरला दफ्तरी घेतली आहे.
“पुणे प्राईम न्यूज”च्या बातमीने तलाठी कार्यालय थोड्या प्रमाणात जागे झाले असले, तरी सुमारे शेकडो वारसांच्या नोंदी, काही रजिस्टर खरेदीखत दस्ताच्या नोंदी, बँक कर्ज नोंदी, बँक कर्ज भरल्यानंतर बोजा कमी करण्याच्या रिलीज डीडच्या काही नोंदी अद्यापही संबंधित तलाठ्याने दफ्तरी घेतलेल्या नाहीत. प्रलंबित कामासाठी वरिष्ठ कार्यालय हडपसर तलाठी कार्यालयावर कारवाई करीत नसल्याने प्रशासन तलाठ्याला ‘सॉफ्ट कॉर्नर’ देत असल्याची भावना सर्वसामान्यांची झाली आहे.
महसूल विभागातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच्या चुकीमुळे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला आहे. काही जणांमुळे महसूलची प्रतिमा मलीन होत आहे. महसूलच्या कामाला विलंबाची खुटी मारणाऱ्या संबंधित तलाठ्याला सोमवारी (23 सप्टेंबर) वरिष्ठ कार्यालयात सहा तास बसवून ठेवण्यात आले व प्रलंबित कामे तातडीने करण्यासाठी विशेष तंबी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वरिष्ठ कार्यालयाचा तिसरा डोळा ‘इन ॲक्टिव्ह’ मोडवर
शासकीय लोकसेवक आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दफ्तरी फेरफार नोंद घेण्यास सात महिन्यांहून अधिकचा वेळ लावत आहे. यामुळे तलाठी कार्यालयाच्या कामकाजात हलगर्जीपणा आढळत आहे. तसेच आवक-जावक कार्यविवरणातील अनियमितता दिसून येत आहे. ई-फेरफारबाबतचा तलाठ्याचा डॅश बोर्ड आपली चावडीवर पाहता येतो. तसेच त्यावर मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांची नजर असते. मात्र, वरिष्ठ कार्यालयाच्या नजरेचा तिसरा डोळा ‘इन ॲक्टिव्ह’ मोडवर असल्याची चर्चा आहे.
हडपसर तलाठ्याने सात महिन्यांनी फेरफार धरला आहे. हा प्रकार गंभीर असून तलाठी टेबलाखालून प्रोटोकॉलची मागणी करत आहे. तलाठ्याचे आकडेही लाख मोलाचे असल्याने मी त्याला प्रतिसाद दिला नाही. संबंधित तलाठ्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. तलाठ्याच्या विरोधात तक्रार केल्यास तलाठी सातबारात मेक मारतात, ती मेक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार, प्रांत व अपर जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत दाद मागावी लागते. त्यामुळे तलाठ्याविरोधात कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही.
– विजय परशुराम भाडळे, अध्यक्ष, प्रियदर्शन, एच बिल्डींग-सहकारी गृहरचना संस्था मर्यादित
या प्रकरणाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.