संदीप बोडके
हडपसर : रजिस्टर दस्त तलाठी कार्यालयात जमा केल्यानंतर सात महिने (२१० दिवस) झाले, तरी तलाठ्याकडून नोंदीचा फेरफार होत नाही, तसेच सुमारे शेकडो मृत व्यक्तींच्या वारसांना, वारस नोंदीच्या फेरफार कामासाठी ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. “प्रोटोकॉल केला तरच काम, नाहीतर आप कतार मे है” असा अनुभव हडपसरच्या तलाठी कार्यालयामध्ये येत आहे. त्यामुळे आता तरी जिल्हाधिकारी कार्यालय याबाबत कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत
मृत व्यक्तींच्या वारसांची फेरफार नोंदीसाठी असलेल्या अर्ज प्रकरणांची यादी, रजिस्टर दस्त तलाठ्याकडे जमा करुनही त्याचे फेरफार धरले नसल्याबाबत पुरावा, तसेच मंडल अधिकाऱ्याने रद्द केलेल्या फेरफारांपैकी दुबार दफ्तरी घेतलेल्या फेरफार नोंदी, ऑनलाईन ई म्युटेशनचे नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार जाणून-बुजून उशिरा दफ्तरी घेणे, फेरफार नोटीस विलंबाने भरणे, कर्जदारांनी बँकेचे कर्ज व्याजासह परतफेड केल्याचा रिलीज डीड दस्त करुनही 7/12 वरील बोजा कमी न करणे, इत्यादी पुरावे नागरिकांनी “पुणे प्राईम न्यूज” कडे सुपूर्द केले आहेत.
मृतांच्या वारसांना आपला माणूस गमावल्यानंतरही, वारस नोंदीच्या फेरफारासाठी विलंबाच्या यातना देण्याची वेळ तलाठी कार्यालयाने आणली आहे. “प्रोटोकॉल केला तरच नोंद, अन्यथा आप लाईन मे बने रहे” असा कारभार हडपसर तलाठी कार्यालयामध्ये सुरू आहे. अशा अजब-गजब कारभाराने महसूल विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे आता तरी वरिष्ठ कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार की, नेहमीप्रमाणे तलाठ्याच्या चुकांवर पांघरूण घालणार, याची चर्चा होऊ लागली आहे.
वरिष्ठ कार्यालय व अधिकारी हडपसर तलाठी कार्यालयावर मेहेरबान असल्याने तलाठ्याचे अनागोंदी कामकाज जोरात सुरू आहे. प्रोटोकॉल करणाऱ्यांचे काम ताबोडतोब होते. मात्र, प्रोटोकॉल न करणाऱ्यांना अनेक महिने वेटींगवर थांबावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करत असल्याने हडपसर तलाठी कार्यालयाच्या सावळ्या गोंधळाला सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.
फेब्रुवारी २०२४ या महिन्यात हडपसर तलाठ्याला रजिस्टर दस्त दिलेला आहे. तरीही फक्त नोंद टाकतो, तुमचे काम करतो, या उत्तरापलीकडे तलाठी काहीही काम करत नाही. गेल्या महिन्यात त्यांच्याच कार्यालयात असलेला माझा दस्त मी शोधून तलाठ्याला दिला आहे. मात्र, अद्यापही तलाठ्याने नोंद टाकली नाही. हडपसरचे तलाठी वारंवार हेलपाटे मारायला लावून नागरिकांना कामांसाठी वेठीस धरत आहेत.
– विजय भाडळे, हडपसर
जनतेची कामे प्रलंबित ठेवणे अथवा कामासाठी अडवणूक करणे, हा प्रकार होणार नाही. याबाबत आजच संबंधित तलाठ्याला वारस नोंदी, रजिस्टर दस्तांच्या नोंदी, बँक बोजा फेरफार नोंदी त्वरीत करण्यासाठी तातडीने अवगत करत आहे. येथून पुढे नागरिकांच्या कामाला विलंब होणार नाही. ज्यांची कामे तलाठ्याने थांबवली असतील, त्यांनी हडपसर मंडल अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
– शेखर शिंदे, मंडल अधिकारी हडपसर