पुणे : जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना सर्व मुद्देमालासह २४ तासामध्ये हडपसर पोलीसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास सुहाना मसाला चौक हडपसर इंडस्ट्रीयल एरिया परिसरात ही चोरी झाली होती. टेम्पोतून कपड्यांच्या मालाची डिलेव्हरी करणाऱ्या दोन कामगारांना चोरट्यांनी लुटले. अशी तक्रार ब्रिजेशकुमार तिवारी (३९, रा.जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सुद्धा त्यांच्या हाती काहीच आले नाही. अखेर त्यांनी फिर्यादी ब्रिजेशकुमार तिवारींकडे १ वर्षापासून काम करणारे कामगार वसिम खान आणि त्याचा भाऊ मेहफस खान यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी गोवंडी मुंबई येथील त्यांच्या सहकाऱ्यांच्या संगनमताने सदर टॅम्पो व माल अपहार करून मुंबई येथे पाठवला असल्याचे कबूल केले.
या प्रकरणी पोलिसांनी वसिम खान, मोहम्मद शौकत, मोहम्मद खान, गुफरान खान यांना गुन्ह्यात अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सर्व १२ लाख २० हजारांचा माल हस्तगत केला.