Hadapsar News : हडपसर, (पुणे) : किशोरवयीन मुलींनी आता नीडर होऊन व्यक्त व्हावे. यासाठी पोलीस प्रशासनाने हेल्पलाइन नंबर बरोबरच दामिनी पथक आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी व मुलींनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत संकोच न करता व्यक्त व्हावे. असे आवाहन हडपसर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांनी केले आहे.
महात्मा फुले वसाहत पुणे सासवड रोड हडपसर येथील सेवा सहयोग संस्थेच्या वतीने किशोरी विकास उपक्रमाअंतर्गत देण्यात येणारे नित्य वापराच्या वस्तू व पोषक आहार अशा स्वरूपातील किशोरी किटचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सारीका जगताप बोलत होत्या.
यावेळी पत्रकार दिगंबर माने, कार्यक्रमाच्या आयोजक शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा दिपक वाघमारे, सेवा सहयोग किशोरी विकास शिक्षिका सुषमा पिसाळ, हडपसर पोलीस स्टेशनच्या दामीनी पथकातील मार्शल वैशाली उदमले, राजश्री जाधव, उषा सोनकांबळे, जास्मिन मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना सारिका जगताप म्हणाल्या, “आपल्या शाळेत महाविद्यालयात अथवा आसपास अशा काही समस्या असतात की आपण त्याबद्दल आपण कधीच व्यक्त होत नाही. आपण जोपर्यंत व्यक्त होणार नाही, तोपर्यंत त्याचा उलगडा आपल्या शिक्षकांना व पालकांना होणार नाही.”
दरम्यान, दामिनी मार्शल यांनी विद्यार्थिनींना चाइल्ड हेल्पलाइन नंबर व ‘गुड टच बॅड टच’ याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस दीदी ही संकल्पना समजून सांगितली. विद्यार्थ्यांशी पोलीस अधिकारी व मार्शल यांनी साधलेल्या सहज संवादाने विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांबद्दलचा आदर अधिकच वाढला. प्रास्ताविक व आभार मनीषा वाघमारे यांनी मानले.