Hadpasar : हडपसर-सासवड रस्त्यावर रस्ता देण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन एका तरुणाच्या हत्येत झाले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने माणुसकीला काळीमा फासत बस चालकाच्या अंगावर दोनदा गाडी घालून त्याला चिरडले. (Hadpasar)

सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय-30, रा. बोथरी, जि. लातूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विजय तानाजी शिर्के (वय 41, रा. सातववाडी, हडपसर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सायकर आणि त्यांचे सहकारी विजय शिर्के हे खासगी बसवर चालक म्हणून काम करतात. रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते दोन बसमधून वडकी नाला परिसरातील महिलांना अक्कलकोटला देवदर्शनासाठी घेऊन जाणार होते. हडपसर-सासवड रस्त्यावर आरोपी कृष्णा कोईलवाड याने आपली मोटार बसच्या आडवी लावून रस्ता अडवला होता.

सागर सायकर यांनी गाडी बाजूला घेण्याबाबत विचारणा केली असता, मद्यधुंद कोईलवाडने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने सायकर बसमधून खाली उतरले. यावेळी कोणताही विचार न करता आरोपीने आपली मोटार थेट सायकर यांच्या अंगावर घातली. धडक बसल्यानंतर सायकर यांनी गाडीचे बोनेट पकडले, मात्र आरोपीने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
दरम्यान, अशा परिस्थितीत मोटार चालक कोईलवाडने कोणाताही विचार न करता. पुन्हा त्यांच्या अंगावर मोटार नेली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या सायकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.







