पुणे: पंधरा वर्ष नगरसेवक, पाच वर्ष आमदारकी, राज्यात सत्ता असतानाही प्रभागातील माळवाडी येथील समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला वाली नाही, साडे चार लाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने सुधारणा केली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी दिला आहे.
नुकताच येथे माजी नगरसेविकेच्या मुलाचा अंत्यविधी झाला. यावेळी मुसळधार पावसात हडपसर-माळवाडी येथील स्मशानभूमी गळत होती. उभा रहायला जागा नव्हती, बसण्याचे बेंच तुटलेले होते, ही अवस्था बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख यांनी पत्रकारांना घेऊन अमरधाम स्मशानभूमीमध्ये धाड टाकली आणि दुरावस्था समोर आली. पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेले, पत्रे फाटलेले, शौचालय घाणेरडे, पाण्याची डबकी, शीतपेट्या पाण्याने भरलेल्या, ब्लॉक तुटलेले, साफसफाई नाही, कचऱ्याचे ढीग अशी अवस्था तिथे होती. मागील दफनभूमीजवळ कुंपण नाही, सुव्यवस्थित बाकडे असल्याने नशा करणाऱ्यांची चांगलीच चंगळ होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत का? असा सवाल समीर तुपे यांनी उपस्थित केला आहे.
हडपसर गाव, माळवाडी, साडेसतरा नळी, मगरपट्टा, ससाणेनगर, काळेपडळ, १५ नंबर, सातववाडी – गोंधळेनगर, चिंतामणीनगर, वैदूवाडी, शंकरमठ परिसरातील नागरिकांची हडपसर येथील एकच अमरधाम स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीसाठी निधीची तरतूद नाही. ती समस्यांचे आगार झाली आहे. याकडे आमदार, प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. येथील अवस्था पाहता नागरिकांशी कुचंबना होत असल्याने तातडीने कार्यवाही झाली नाही, तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा समीर तुपे यांनी दिला आहे.