दौंड : दौंड शहरात पोलिसांनी कारवाई करून एका ट्रक मधून तब्बल ५४ लाख ९९ हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. बारामती दौंड नगर राष्ट्रीय महामार्गावरील गोल राउंड परिसरात मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रक चालक रवि अर्जुन होळकर (रा. कासुर्डी, ता. दौंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक राज्यातून या गुटख्याची वाहतूक दौंड मार्गे अहिल्यानगर शहराकडे केली जात होती, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रक मधून गुटख्याची वाहतूक दौंड मार्गे अहिल्यानगर कडे केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणार्या ११२ या क्रमांकावर देण्यात आली होती. त्यानुसार दौंड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने खातरजमा करून गुटख्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक (क्रमांक के. ए. २९, ए २५८८) ताब्यात घेतला. ट्रकमध्ये एकूण १४१ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याचे पुडे आढळून आले. पोलिसांनी ५४ लाख ९९ हजार ८०० रूपये किमतीचा गुटखा, १० लाख रूपये किमतीचा ट्रक, असा एकूण ६४ लाख ९९ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, ट्रकचालक हा बदली चालक असल्याने त्याला ट्रकमधील गुटखा कर्नाटक राज्यातून नेमका कोठून भरला याची माहिती नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दौंड पोलिस ठाण्यात अंमलदार पवन शंकर माने यांच्या फिर्यादीनुसार चालक रवि होळकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलिस करत आहेत.