पुणे : पुण्यातील रास्ता पेठ परिसरात बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुदसर इलियास बागवान (वय-४०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अन्वर शरफुद्दिन शेख (वय-३८, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपीविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात सिगारेट, अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने, अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यशासनाने गुटखा वाहतूक, विक्रीवर बंदी घातली आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री, तसेच वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथक रास्ता पेठेत गस्त घालत होते.
यावेळी रास्ता पेठेतील एका सोसायटीमध्ये दोघांनी गुटखा, पानमसाल्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ७१६ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव, उदय राक्षे यांनी केली.