-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातरवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शालेय मूल्यमापन करण्यासाठी राबवले जात आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे मूल्यांकन करण्यासाठी शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी शाळेला भेट दिली.
शिरूर तालुक्यातील सातरवाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा या अभियानात पहिल्या टप्प्यात निमगाव म्हाळुंगी केंद्रात पहिला क्रमांक पटकावला. 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेत सातरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेउन निमगाव म्हाळुंगी केंद्रात दुसरा क्रमांक मिळवल्याने या शाळेची पंचक्रोशीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून चर्चा आहे.
अभियानाची उद्दिष्टे
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
शालेय परिसर आणि विद्यार्थी गुणवत्ता वर्गातील विद्यार्थ्यांची तयारी कशी आहे. चित्रमय शालेय परिसर सुंदर परसबाग पाहून कळमकर यांनी समाधान व्यक्त करत सर्व मुलांना शाब्बासकी दिली. यावेळी उपस्थित आदरणीय केंद्रप्रमुख सुनील जोशी, लक्ष्मण जाधव, पोपट रासकर, रांजणगाव शाळेचे मुख्याध्यापक सुरेश थोरात यावेळी उपस्थित होते.