पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ अशा एकूण १५ मतदान केंद्रांवर महापालिकेच्या वतीने ‘हरित मतदान केंद्र’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध पाम प्रजाती, शोभिवंत झाडे, फळझाडे, आयुर्वेदिक औषधी वनस्पती अशा विविध वनस्पतींचे माहिती प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू आहेत. सर्व मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ मतदान केंद्रांवर हरित मतदान केंद्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
या मतदारसंघातील सदर हरित मतदान केंद्रांवर अनंत कुंदा, हॅमेलीया, जट्रोफा, अॅलामेंडा, जास्वंद. फळझाडे आवळा, जांभूळ, चिंच, पेरू, आंबा, सीताफळ, फणस, आयुर्वेदिक औषधी झाडांमध्ये कडूनिंब, बकुळ, उंबर, कोरफड आदी प्रजातींची माहिती दिली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.