केडगाव : दौंड येथे मुळा-मुठा नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, यामुळे प्रदूषणासह पाणी दूषित होत आहे. अशा प्रकारच्या जलपर्णी वारंवार वाढत असून, जलपर्णी काढण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष उपाययोजना करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.
पुण्यातील सांडपाण्यामुळे दूषित पाणी मुळा-मुठा नदीच्या पात्रात येत असते. दौंड तालुक्यात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असल्याने पाणी नदीत स्थिर अवस्थेत असते. यामुळे जलपर्णी वाढत आहेत. शेतीसाठी पाणी वापरताना या जलपर्णीचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. नदीच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गावांतील कुटुंबे नदीत मासेमारी करून त्यांचा उदरनिर्वाह भागवत असतात. मात्र, जलपर्णी वाढल्यास त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर देखील होतो. नदीतील जलचरदेखील जलपर्णीमुळे मृत पावतात. अनेक वेळा स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते लोकवर्गणी अथवा स्व-खर्चातून सदर जलपर्णी काढण्याचा प्रयत्न करतात; मात्र, काही महिन्यात जलपर्णी परत वेगाने वाढते. जलपर्णीमुळे पाणी दुषीत झाले आहे. याचा परिणाम येथील नारिकांच्या आरोग्यावर होत आहे. संबधित प्रशासनाकडून लवकरात लवकर उपययोजना आखावी, असे मत नदीकाठी वसलेल्या गावातील नागरिकमधून व्यक्त होत आहे.
जलपर्णीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काहीच कार्यवाही नाही
प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही जलपर्णीबाबत काहीच कार्यवाही केली जात नाही. जलपर्णी नष्ट करण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात नाहीत. तसेच वेळीच जलपर्णी काढण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा प्रश्न दरवर्षी जटिल होत आहे.
– विकास शेलार, संचालक, भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस
जलपर्णी हटवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे
शहरातील हजारो लिटर मैलामिश्रीत पाणी थेट मुळा-मुठा नदीत सोडले जात आहे. मैलामिश्रित पाणी जलपर्णी वाढीस पोषक असल्यामुळे, अगोदरच नदीत असलेली जलपर्णी अधिकच वाढत आहे. जलपर्णी हटवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे, अशी आमची मागणी आहे.
– शिवाजी वाघोले, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड