बारामती : परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीतून मिळण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. तसेच धनगर समाज सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहील, असेही त्यांनी म्हटले.
महादेव जानकर हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ‘परभणी मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर मी बारा मतदारसंघाचा दौरा केला आहे. केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल. बारामती, इंदापूर, दौंड येथे मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. महायुतीतून रासपला परभणीची जागा मिळण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अजित पवार यांचे सर्व उमेदवार निवडून यावेत हे माझे कर्तव्य आहे’.
तसेच 2014 मध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांना आपण कडवी झुंज दिली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. आपण उपमुख्यमंत्री पवार गटाच्या बाजूने असल्याने धनगर समाज बांधव अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.