उरुळी कांचन, (पुणे) : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी देखील कृषी विभागाकडून अनुदानाची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
कृषि विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती हवेली यांचे मार्फत शेतकरी लाभार्थींसाठी बायोगॅस संयंत्र बांधकाम उभारणीसाठी अनुदान देणे ही योजना सुरू आहे. त्यामुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.
बायोगॅसचे आरसीसी बांधकाम किंवा सिंटेक्स बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी पंचायत समिती हवेली कार्यालयाकडून निवड केलेल्या पात्र लाभार्थी यांना अनुदान देण्यात येणार आहे. शौचालय जोडलेल्या संयंत्रांना १ हजार ६०० रुपये अधिक अनुदान दिले जाणार आहे. बायोगॅस हे शेणाचा वापर करून तयार केले जाते. बायोगॅस निर्मितीनंतर सलरी म्हणजे शेणाचा वापर खतासाठी केला जाऊ शकतो.
अर्थातच यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. खरं पाहता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय केला जातो. अशा परिस्थितीत पशुपालक शेतकरी बांधव बायोगॅस प्लांट उभारून इंधनाचा प्रश्न सोडवू शकणार आहेत.
दरम्यान, २ ते ४ घनमीटर संयंत्रासाठी कुटुंबामध्ये जनावरे आवश्यक असून शेणाची उपलब्धता होणे आवश्यक आहे.
संयंत्रासाठी केंद्र निधी १४३५० जिल्हापरिषद निधी १० हजार रुपये व शौचालय जोडलेस १ हजार ६०० असे एकूण २५ हजार ९५० रुपये अनुदान सयंत्र उभारणी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येते. तरी कृपया जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या स्वयंपाक घरामध्ये कायमस्वरूपी गॅस उपलब्ध होण्यासाठी बायोगॅस संयंत्राची उभारणी करावी.
अधिक माहितीसाठी उरुळी कांचन येथील ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस – 90499 89478, सुमित शिंदे – 9657085544, अनिल कुमार बागुल 9226222861 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभाग पंचायत समिती हवेली यांनी केले आहे.