लोणी काळभोर, (पुणे) : देवदर्शनावरून माघारी जाताना अज्ञात ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात आजी व नातीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सहजपुर फाटा (ता. दौंड) येथे रविवारी (ता.15) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
लक्ष्मी गणपत फणसे (वय-53) वैदश्री प्रसन्न फणसे (वय-5) असे मृत्यू झालेला आजी व नातीची नावे आहेत. तर गणपत जयवंत फणसे (वय-60, सर्व रा. सुस, पाषाण, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फणसे कुटुंब हे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. देवदर्शन करून फणसे कुटुंब हे सुस येथे दुचाकीवरून घरी चालले होते. दरम्यान, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, फणसे यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात गणपत, लक्ष्मी व वेदश्री फणसे हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. तर लक्ष्मी यांच्या अंगावरून ट्रक गेला होता.
दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या तिघांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, लक्ष्मी व वेदश्री या दोघींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी गणपत फणसे यांना पुण्यातील सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
सुस गावावर पसरली शोककळा
सुस येथील फणसे कुटुंब हे एक सुशिक्षित कुटुंब आहे. गणपत फणसे हे पत्नी लक्ष्मी व पाच वर्षाची नात वेदश्री यांना दुचाकी वर घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून घराच्या दिशेने परत येत होते. तेव्हा सहजपूर फाटा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात लक्ष्मी व वेदश्री फणसे या आजी व नातीचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबा गणपत फणसे हे गंभीर जखमी झाले आहेत. आजी व नातीचा मृत्यू झाल्याने फणसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, तर सुस गावावर शोककळा पसरली आहे.