पुणे : नायगाव (ता. खंडाळा) येथील डुक्करमळा परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मावस आजोबा आणि नातवाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही गावच्या यात्रेसाठी पाहुण्यांकडे गेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत शाम थिटे (४६, रा. पर्वती, पुणे) व त्यांच्या साडूचा नातू रुद्र प्रशांत चव्हाण (७, रा. जांभुळवाडी, कात्रज) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नायगावची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी प्रशांत व रुद्र हे दोघेही नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी नायगाव येथे असणाऱ्या तलावावर प्रशांत थिटे हे मुलगा प्रेम थिटे व चुलत भावाचा नातू रुद्र चव्हाण व आणखी दोघांना घेऊन पोहण्यासाठी गेले होते. रुद्र पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. ते पाहून प्रशांत यांनी रुद्रला वाचवण्यासाठी उडी मारली. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यामध्ये गटांगळ्या खाऊ लागले. काही क्षणातच दोघेही पाण्यामध्ये बुडाले.
त्यानंतर प्रेम याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. काही अंतरावर बकरी चारण्यासाठी आलेल्या महिलेने प्रेमचा आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्या महिलेने आजूबाजूला असणाऱ्या ग्रामस्थांना हाक मारून बोलवले. मात्र, धरणावर पोहण्यासाठी आलेले सर्वजण स्थानिक नसल्यामुळे नेमकं कोण बुडाले आहे, हे कोणालाच समजत नव्हते. त्यामुळे तिथे आलेल्या स्थानिकांनी प्रेम याला दुचाकीवरून गावात आणले.
त्यावेळी गावच्या पारावर बसलेल्या ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी बुडलेल्यांची शोधाशोध सुरू केली होती. मात्र त्याआधीच तासभर आजोबा नातवाचा बुडून मृत्यू झाला होता.