यवत: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विजयी उमेदवार सुप्रिया सुळे यांचा आज (दि. ६) दौंड तालुक्यातील विविध गावांत स्वागत करण्यात आले. यवत येथे सायंकाळी ४ च्या सुमारास डीजे व फटाक्यांची आतिषबाजी करत यवतकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यवत ग्रामस्थांच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दौंडकरांनी शेवटपर्यंत बेसावध ठेवत मताधिक्य कोणाला जाईल, हे कळूनच दिले नाही. विरोधी पक्षाला आपल्याला सर्व ठिकाणी बूथ प्रमुख मिळणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु, असे न झाल्याने त्यांची चिंता वाढली होती.
कांद्याला – दुधाला भाव नाही
सहा महिने झाले कांदा, दूध व दुष्काळाचे प्रश्न गंभीर असून सरकार याबाबत काहीच बोलत नाहीत. दुधाचे भाव वाढले नाही, तर आपण लवकरच उपोषणाला बसणार आहोत, असे सुळे यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकार हे पक्षफोड, घरफोड व भ्रष्टाचारात व्यस्त होते, सरकारला सर्वसामान्य जनतेचे कोणतेही घेणे देणे नव्हते. दौंड तालुक्यातील सुज्ञ जनतेने २६ हजारांचे मताधिक्य देऊन विजयी केल्याबद्दल दौंड तालुक्यातील जनतेचे आभार यावेळी सुप्रिया सुळे यांनी मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नामदेव ताकवणे, सोहेल शेख, रामभाऊ टुले, डॉ. वंदना मोहिते, सचिन काळभोर, वंचित आघाडीचे उत्तम गायकवाड, बायजाबाई पवार, काँग्रेस पक्षाचे विठ्ठल दोरगे, अरविंद दोरगे, मोहसीन तांबोळी, शिवसेनेचे अशोक दोरगे, मयूर दोरगे, सचिन दोरगे, दीपक दोरगे, शुभम दोरगे, भूपेंद्र शहा, दीपक तांबे, रमेश लडकत यांसह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.