अमोल दरेकर
शिरूर : औद्योगिक नगरी सणसवाडी (ता. शिरूर) येथे केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांचे डिजिटल रथाच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आले. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करताना त्यांना स्मरूण विकसित भारत करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.
केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी जुबानी, मेरी कहानी’च्या माध्यमातून संबोधित केले. आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करताना आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर इत्यादी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा सर्वांनी लाभ घेऊन संघटनेतील सर्वांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अशी कीटकनाशके, सूक्ष्म युरियाची फवारणी फ्लोटींग ड्रोनद्वारे करण्याचे प्रात्यक्षिक सणसवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून भविष्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या वेळी सरपंच सुवर्णा दरेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दरेकर, जिल्हा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य डॉ. मोहन हरगुडे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अशोक हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन हरगुडे, ग्रामविकास अधिकारी पवणे, अतुल साठे, विद्याधर दरेकर यांसह विविध अधिकारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.