भीमाशंकर: बोरघर लगत असलेल्या जुने आंबेगाव येथील आदिवासी कातकरी समुदायाच्या वस्तीची व नागरिकांची नोंद झाल्याने या स्वतंत्र महसुली गावाची पहिली ग्रामसभा तब्बल ४० वर्षांनी पार पडली आहे. बोरघर (ता. आंबेगाव) येथील जुने आंबेगाव येथील कातकरी वस्तीवर नव्याने तयार झालेल्या स्वतंत्र महसूल गावाची ग्रामसभा सरपंच विजय जंगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत पाणी, लाईट, घर, रोजगार या मुलभूत प्रश्नांच्या पूर्ततेसाठी चर्चा करण्यात आली.
कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण सन १९७२ सुरु झाले व २००० ला पूर्ण झाले. मात्र या धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांची परवड झाली. यामधील आदिवासी कातकरी समुदायाला तर गाव आणि ग्रामपंचायतच मिळाली नव्हती. अखिल भारतीय किसान सभा, ग्रामपंचायत बोरघर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल आठ वर्षांनी या आदिवासी कातकरी जमातीच्या व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत मिळाल्याने शासन दप्तरी झाली. आजपर्यंत येथील कित्येक व्यक्तींच्या जन्माची वा मृत्यूची नोंद झालेली नाही, अनेकांकडे कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून आजतागायत हा समुदाय वंचित राहिला. मात्र लोकप्रतिनिधी आणि शासनाने यांच्याकडे लक्ष दिलेले नव्हते.
या ग्रामसभेत कातकरी वस्तीच्या मूलभूत समस्या व त्यावरील उपाय काय असावेत, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी या ग्रामसभेत कातकरी वस्तीच्या घरांच्या जागेच्या संदर्भात, तेथील मंजूर अंगणवाडी, दारू बंदी व रोजगार निर्मिती, महत्त्वाचे दाखले काढून देणे व त्यासाठी येणाऱ्या अडचणींची पूर्तता करणे, घरगुती लाईट व वाढीव लाईटबील यासाठी पर्यायी सौरयुनिट, पाण्याचा प्रश्न, सौर युनिटद्वारे पाण्याची व्यवस्था इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जुने आंबेगाव स्वतंत्र महसूल गावाची ग्रामकोष समितीमध्ये एक महिला प्रतिनिधी व एक पुरुष प्रतिनिधी यांची निवड करुन एक समिती स्थापन करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थीत नागरिकांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती दिली.