लोणी काळभोर (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतकरी जन आक्रोश मोर्चासाठी गर्दी करण्यासाठी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरुनगर महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना रात्री उशिरापर्यंत सभेसाठी थांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यांनतर आता या आक्रोश मोर्चासाठी उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचे पाहायला मिळत आहे. हे ग्रामपंचायत कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे ठिकठिकाणी लावण्याचे काम करत आहेत.
दरम्यान गुरुवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वतीने शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (दि. २७) सकाळी जुन्नर तालुक्यात या आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची गावे, आंबेगाव तालुका आणि सायंकाळी सात वाजता हा आक्रोश मोर्चा राजगुरुनगर येथे आला. राजगुरुनगर मार्केट यार्डशेजारील ऑईल मिलसमोर सभेचे आयोजन करण्यात आले
मात्र, मोर्चाची वेळ झाली तरी सभेच्या ठिकाणी गर्दी नव्हती. त्यामुळे हुतात्मा राजगुरुनगर महाविद्यालयातील वसतिगृहातील मुलींना सभेसाठी आणण्यात आले. सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू झालेली सभा नऊ वाजून पन्नास मिनिटांनी संपली. तोपर्यंत विद्यार्थिनींना बसून ठेवण्यात आले होते.
एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी जन आक्रोश मोर्चासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी काम करताना दिसत आहेत. याबबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार करून मोर्च्याच्या आयोजकांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
– जनार्धन दांडगे, अध्यक्ष, भाजप सोशल मीडिया, पुणे जिल्हा