लोणी काळभोर : शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीची ग्रामपंचायत कर्मचारीच छेडछाड करत असल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग परिसरात शुक्रवारी (ता.१२) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. ग्रामपंचायत कर्मचारीच जर गैरवर्तन करत असतील तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन शालेय विद्यार्थिनी शुक्रवारी (ता.१२) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी
काळभोर परिसरात नामांकित शाळेत चालल्या होत्या. पायी जात असताना पाषाणकर बागेच्या कॉर्नरजवळ आल्या. तेव्हा खाक्या रंगाची कपडे परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुलींची छेड काढली. अश्लीश शब्द व हावभाव करून मुलींचा विनयभंग केला.
यावेळी मुलींनी दोन्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बडबड केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी मुलींना कट मारला आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेले. लोणी काळभोर परिसरात नामांकित शाळा असल्याने, या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र, या दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
दरम्यान, हे दोन्ही कर्मचारी एका मोठ्या ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत. नागरिकांना सेवा पुरविणे हे त्यांचे कर्त्यव्य आहे. मात्र, दोन्ही कर्मचारी सेवक असतानादेखील असे कृत्य दिवसाढवळ्या कसलीही भीती न बाळगता करत
असतील तर लोणी काळभोर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करावी
कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील शाळेच्या आवारात रोडरोमिओ नेहमी फिरत असतात. या रोडरोमिओंच्या
त्रासाला विद्यार्थिनी कंटाळल्या आहेत. एखादी मोठं कृत्य घडण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाने रोडरोमिओंवर कडक
कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत. तसेच ग्रामपंचायत प्रशासन या दोन्ही कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.