पुणे : एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे. त्या अनुषंगाने वढू बु. (ता. शिरुर) शिक्रापुर पोलीस ठाणे हद्दीत अनुयायी बहुसंख्येने येतात. त्यामुळे बंदोबस्तासाठी पुणे ग्रमीण पोलीस दल सज्ज झालेले असून, पूर्ण बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण दलाकडून एक पोलीस अधिक्षक, ५ अपर पोलीस अधीक्षक, २१ उपविभागीय पोलीस अधिकारी, २५५ पोलीस अधिकारी, २,५९० पोलीस अंमलदार, १००० होमगार्ड, ४ एसआरपीएफच्या तुकड्या व बीडीडीएसची ४ पथके तैनात करण्यात आली आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाकडून १९२ सीसीटीव्ही कॅमेरे, ६ ड्रोन कॅमेरे, ६ व्हिडिओ कॅमेरे तसेच पी. ए. सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, टॉयलेट, लाईट इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस विभाग व प्रशासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, बंदोबस्त अनुषंगाने ब्रिफिंगदरम्यान कोल्हापुर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी व पुणे ग्रमीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले. तसेच बंदोबस्ताची पाहणी केली. ३० डिसेंबरपासून बंदोबस्त तैनात राहणार आहे. तर १ जानेवारीचा बंदोबस्त चोख असेल, असेही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी म्हटलं आहे.
नगररोडकडून येणाऱ्यासाठी पार्किंगची व्यवस्था वक्फ बोर्ड पार्किंग येथे तर चाकण शिक्रापुर मार्गे येणाऱ्यांसाठी जाधव पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वाहने पार्किंग व सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था पोलीस दल करणार आहे. पार्किंग ठिकाणावरुन पी. एम. पी. एल बसेसच्या माध्यमातून कोरेगाव भीमापर्यंत आणण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.