राहुलकुमार अवचट
यवत : यवत (ता. दौंड) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध विषयांच्या चर्चासह ग्रामसभा गुरुवारी (ता.२५) संपन्न झाली. मात्र, या सभेत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने यवतकरांनी ग्रामसभेकडे पाठ फिरविली आहे.
यवत येथील ग्रामसभा सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, नाथदेव दोरगे, इब्राहिम तांबोळी, राजेंद्र शेंडगे, गौरव दोरगे, सदस्या गौरी दोरगे , युवानेते गणेश शेळके, विशाल भोसले, दत्ता डाडर, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत मागील सभेचे प्रोसिडींग, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, विविध शासकीय योजना , ५% , १०%, व १५% अंतर्गत चर्चा, यांसह ग्रामपंचायत निधी व शासकीय निधीतून नविन विकास कामे पुरविणे व प्रशासकीय मान्यता घेणे. या संदर्भातील अजेंठाचे वाचन ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले.
यावेळी प्रकाश अदापुरे यांनी सटवाईमाता मंदिर व मोबाईल टॉवर बाबतीत प्रश्न उपस्थित केले. तर अरविंद दोरगे यांनी वार्ड क्र २ मध्ये सिमेंट रस्ता व गटारलाईन,विद्युत सिंगल फेज लाईन, या कामांची मागणी केली. तसेच वार्ड इंदिरा नगर येथील अंगणवाडी सेविका सुकेशिनी गायकवाड यांनी २ वर्षापासून अंगणवाडीचे भाडे थकीत असुन ते देण्याची मागणी केली.
दोरगेवाडी येथील महिलांचा आक्रोश पाहता, वेळो वेळी बंदिस्त ड्रेनेज लाईन, डासांचा प्रादुर्भाव, धुराडी फवारणी होत नाही, कचरा घंटागाडी बाबतीत प्रश्न शितल दोरगे उपस्थित केले. अनेक वेळा निवेदन देऊनही कामे होत नाही. अशी खंत व्यक्त केली. यावेळी विविध कामासंदर्भात लेखी निवेदने ग्रामस्थांनी दिले असुन यातील शक्य ती कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन सरपंच समीर दोरगे यांनी दिले
दरम्यान, ग्रामसभेची दवंडी ७ दिवसांपुर्वी देणे आवश्यक असताना २ दिवस अगोदर दवंडी देण्यात आली. तर गावातील एकाही फलकावर ग्रामसभेची नोटीस लावली नसल्याने प्रशासकीय उदासीनता दिसुन आली. तसेच कोरम पुर्ण होण्यासाठी जवळपास ४० मिनिटे वाट पाहवी लागली. अजेंठामध्ये असलेल्या कृषी योजनांची माहिती देण्यासाठी कृषी सहाय्यक अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.