संदिप टुले
केडगाव : गावचा कारभार कसा चालतो, विकासाची कामे दर्जेदार होतात का? यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामस्थांना ग्रामसभेच्या माध्यमातून मिळाले आहेत. पण ग्रामसभेकडे ग्रामस्थानी अक्षरशः पाठ फिरवली जात असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांही ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक जागोजागी पाहायला मिळत आहे.
पूर्वी शासनाने ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला होता, त्याला प्रतिसाद चांगला मिळत होता. कारण बाहेरचे चाकरमानी, अधिकारी ग्रामसभेत सहभागी होऊन अभ्यास पूर्ण प्रश्नांमुळे प्रशासन व गाव पुढारी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यासाठी ग्रामस्थ जमत असत. त्यावेळी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन ग्रामसभा दाखवून गाव पुढारी ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेत होते. सह्या झाल्याने अधिकारी कामांना मंजुरी देत होते. शासनाने स्वतंत्र सभा घेण्याचे आदेश काढल्याने ग्रामसभा घेणे क्रमपात्र झाल्याने ग्रामसभा घेतल्या जात आहेत. पण ग्रामस्थांबरोबर ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याने कोरम अभावी ग्रामसभा तहकूब होत आसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आयोजित ग्रामसभांकडे ग्रामस्थांनी पाठ फिरविण्याची बाब गंभीर असल्याचे मत काही समाजसेवकांनी व्यक्त केले आहे. केवळ याच नाही तर मागील वर्षभरातील सर्व ग्रामसभांना ग्रामस्थ गांभीर्याने घेत नसल्याचे बोलले जात आहे. एकीकडे गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असताना, ग्रामस्थांकडून होणारे दुर्लक्ष समाजहिताच्या कामाचा दर्जा ढासळविणारे ठरण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ग्रामसभेसाठी जनजागृती गरजेची?
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या ग्रामसभेस काही ठराविक ग्रामस्थ उपस्थित रहात असल्याचे वास्तव आहे. याशिवाय अनेक गावांतील सदस्य अप्रत्यक्षरीत्या ठेकेदार झाले आहेत. गावातील ठेकेदार सदस्य आपल्या सोईची विकास कामे मंजूर करून घेण्यासाठी धडपडत असतात. तर अनेक सदस्य ग्रामसभेला दांडी मारतात. जिथे सदस्यांचीच उपस्थितीबाबत उदासीनता आहे, तिथे ग्रामस्थ कसे उपस्थित राहतील असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व जागृती होणे गरजेचे आहे.