यवत / राहुलकुमार अवचट : कोरमअभावी यवत येथील ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की यवत ग्रामपंचायतीवर आली. २६ जानेवारीनिमित्त होत असलेल्या ग्रामसभेचे सकाळी अकरा वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. परंतु, सकाळी साडे अकराच्या सुमारास कोरमअभावी ही ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगितले.
२६ जानेवारीची ग्रामसभा असूनदेखील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे व मुख्याध्यापक शिंदे यांसह या ग्रामसभेसाठी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे व राजेंद्र खुटवड वगळता इतर सर्व सदस्यांनी व सर्वच शासकीय विभागांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली.
यावेळी भांडगाव ग्रामपंचायतचा पदभार असल्याने यवत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कदम हे देखील अनुपस्थित होते. १८ हजारच्या जवळपास मतदारदर असलेल्या यवत येथील ग्रामसभेसाठी फक्त १० ते १५ नागरिकच उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून अधिकाधिक नागरिक ग्रामसभेसाठी कसे उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तहकूब झालेली ग्रामसभा मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.