राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील पश्चिम भागात मोठी असलेली यवत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे आज सकाळी ११ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली. त्यामुळे कोरम अभावी ग्रामसभा करण्यात आली.
दौंड तालुक्यातील सर्वात मोठी असलेली यवत ग्रामपंचायतीची सुमारे १८ हजार लोकसंख्या आहे. या ग्रामसभेला कोरमसाठी आवश्यक असलेले १०० ग्रामस्थ ही उपस्थित नव्हते. सरपंच समीर दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अर्धा तास होऊनही कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी ग्रामसभा तहकूब केल्याचे सांगितले. दरम्यान, तहकूब केलेली ग्रामसभा सोमवारी ३ जून रोजी सकाळी ११ वाजता होईल असे जाहीर केले.
यावेळी १७ सदस्य असलेल्या सदस्यांपैकी ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, मनोहर खुटवड, ग्रामपंचायत सदस्य उज्वला शिवरकर, मंदाकिनी कुदळे, लंका कोळपे असे पाचच सदस्य उपस्थित होते. कोरम पूर्ण करण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांच्या सह्या घेतल्या. ही बाब ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर यापुढे अशा सह्या घेतल्या जाऊ नये अशा सूचना त्यांनी दिल्या.
गावातील विविध विकास कामांना मंजुरीसाठी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून ग्रामसभा घेण्यात येतात. मात्र, ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती नसेल, तर ग्रामसभा घेऊन उपयोग काय? अशी खंत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामसभेला उपस्थिती वाढविण्यासाठी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.