Gram Panchayat Election result 2023 : बारामती : शरद पवार आणि बारामती हे जणू समीकरणच आहे. बारामतीत गेल्या ५० वर्षांपासून शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आता अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली आहे. त्यानंतर बारामती पवार साहेबांची की अजित दादांची, या प्रश्नाचे उत्तर आता ग्रापमंचायत निवडणुकीत जनतेने दिले आहे. बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच हाती आला असून, २६ पैकी २४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर दोन ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आला आहे.
बारामतीतील चांदगुडेवाडी व पारवडीत भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. तर इतर ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या दादा गटाचे वर्चस्व आहे. पवारांच्या काटेवाडीच्या ग्रामपंचायतीचा देखील आज निकाल आहे. काटेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. अजित पवारांच्या पॅनल विरोधात भाजपचे पॅनेल उभे होते. काटेवाडी ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता राहिली आहे. मात्र, येथे नेमके काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.