योगेश मारणे
न्हावरे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शासनाच्या विविध पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष व महाराष्ट्र सेवा प्रशासनातील आदर्श व्यक्तिमत्व, वरिष्ठ माजी सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली.
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली असून, निंबाळकर यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवा यांमधील तीन वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी या समितीमध्ये आहेत व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव हे सदस्य सचिव म्हणून या समितीमध्ये काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरूवारी (ता. १४) या तज्ज्ञ समितीच्या निवडीसंबंधी शासन निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह शासनाच्या विविध पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी २०२३ च्या दुसऱ्या पावसाळी अधिवेशनात कळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे शासनाने त्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शासनाने समिती स्थापन केली असून, राज्य लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आदर्श प्रशासकीय अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
किशोरराजे निंबाळकर हे मूळचे न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील असून, निंबाळकर यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून अतिशय पारदर्शक कामकाज करताना आदर्श प्रस्थापित केला आहे.